माझा विजय म्हणजे शिक्षकांनी घेतलेला बदला; आता पेंशनचा प्रश्न सोडवणार – म्हात्रे 

Maharashtra MLC Election :  विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले होते. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. शिंदे गट – भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असून या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, कोकण मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रेंनी (BJP’s Dnyaneshwar Mhatre)  बाजी मारली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैध ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रेंनी दिलेली प्रतिक्रिया (Dnyaneshwar Mhatre’s reaction after the win)
ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता तो विश्वास आज सफळ झाला आहे. रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर (Ravindra Chavan, Uday Samant, Deepak Kesarkar) यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे हा विजय सुकर झाला. हा शिक्षकांचा, 33 संघटनांचा विजय आहे. मला 20 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे. जो कोटा गरजेचा होता तो पहिल्याच फेरीत पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर दिली.

आझाद मैदानावर आंदोलनं करुन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन अनुदानाचा प्रश्न सोडवला होता. आता पेंशनचा प्रश्न सोडवायचा आहे. हा शिक्षकांनी घेतलेला बदला आहे. कारण सहा वर्ष शिक्षकांची कामं झाली नव्हती, असा त्यांचा आरोप होता. त्याउलट साडेआठ हजार शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, संस्थांची कामं मी स्वत: वेळ देऊन केली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या विजयात असेल.