म्हात्रेंचा विजय हा शिंदे-फडणवीस सरकारवरील कोकणवासीयांनी दाखविलेला विश्वास आहे – सामंत

Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले होते. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. शिंदे गट – भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असून या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, कोकण मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रेंनी (BJP’s Dnyaneshwar Mhatre) बाजी मारली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैध ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

दरम्यान, या विजयानंतर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचा विजय हा शिंदे – फडणवीस सरकारवरील कोकणवासीयांनी दाखविलेला विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा! असं सामंत यांनी म्हटले आहे.