‘ही’ ३ महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला देऊ नका; शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचा एक गटही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर आता अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ८ नेत्यांकडे मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेगवेगळी खाती सोपवली जातील. अजित पवार यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात महसुल खातं दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सांस्कतिक मंडळ, छगन भुजबळ यांना ओबीसी आणि बहुजन विकास खातं, हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक आणि कामगार, धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक विभाग, अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग, धर्मराव अत्राम यांच्याकडे आदिवासी विभाग, संजय बनसोडे यांच्याकडे क्रिडा व युवक कल्याण, अनिल पाटील यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवारांवर निधी न दिल्याचा आरोप करत मविआ सरकारमधून बाहेर पडलेले शिवसेना आमदार आता अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदावर नेमणूक झाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात आज नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेटची पहिलीच बैठक होत आहे. तत्पूर्वी शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीतही नाराजीचा सूर उमोटला. या बैठकीत मंत्र्यांनी अर्थ, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादीला देऊ नका अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली तर पुन्हा आपली आर्थिक कोंडी होऊ शकते अशी भीती शिवसेना आमदार, मंत्र्यांना आहे.