मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची कोट्यावधींची मालमत्ता जप्त; नारायण राणे म्हणाले…

मुंबई – ईडीनं मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत.ईडीनं थेट ही कारवाई केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.  6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.

 

यासंदर्भात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,  आगे आगे देखिए होता है क्‍या! महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या!

आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच!  असं म्हणत राणे यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यावर हल्लाबोल केला आहे.