‘मुंबईत मला जे घर देणार आहात ते देऊ नका, तेच पैसे शेतकऱ्यांना आणि एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी एक मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla) मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे ते म्हणाले. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं.

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर सरकारवर टीका होऊ लागली आहे. आमदारांची कोट्यवधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7 ते 8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे. चार कोटीचा आमदार निधी दिला. तो आधी मुळात दोन कोटी होता. कोविड असतानाही चार कोटी केला. आता पाच कोटी केला. ड्रायव्हरचे पगार वाढवले. सहाय्यकचे पगार वाढवले. घरे देणार. कशासाठी पाहिजे घरं?, असा सवाल करतानाच आमदार व्हा म्हणजे तुम्हाला घरं मिळतील. पाच कोटींचा निधी मिळेल, असा

कुणी काही आमदार (mla) होण्यासाठी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता. आमदारांचा रोष पत्करून हे मी बोलत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मला मुंबईत घर नाही तरीही मला जे घर देणार आहात ते देऊ नका. तेच पैसे शेतकऱ्यांना द्या. एसटी कर्मचाऱ्यांना पैसे द्या. माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोतांसारखे सोडले तर प्रत्येकाचे चार चार घरे आहेत. क्षमता आहे, असं पाटील म्हणाले.