राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरु झालं; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

सावंतवाडी, सिंधुदुर्ग: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी व शरद पवार यांची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे टीकेची झोड उठली होती. त्यानंतर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांची तुलना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केली. या सर्वांवर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेत शिवाजी महाराजांवरून (Shivaji Maharaj) राजकारण करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

जातीपातीच्या पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं. काही जण राजकीय स्वार्थासाठी इतिहास वापरत आहेत. राष्ट्रवादीच्या जन्मापासून, साल १९९९ पासून महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरु झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचं, असं राज ठाकरे बोलले.

पुढे जेष्ठ नेते शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार कधीही छ. शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेत नसत. सत्ता गेल्यावर अचानक नाव घ्यायला लागले. व्यासपीठावरही फक्त शाहू-फुले-आंबेडकरांच्या प्रतिमा. पण ज्यांच्या प्रेरणेवर शाहू-फुले-आंबेडकर विचार आहे त्या आमच्या शिवछत्रपतींची प्रतिमाही कुठे नसायची, असे राज ठाकरे शेवटी म्हणाले.