गदारोळात संसदेचे हे अधिवेशन वाया जाऊ देवू नका – मनसे

नवी दिल्ली- आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता असून पेगासस हेरगिरी प्रकरण, पूर्व लडाखमधील चिनी ‘घुसखोरी’ या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत असून राष्ट्रपती राम नाथ कोविंद त्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. त्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021-22 साठी आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.

दरम्यान, आज संसद भवनात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करून खुल्या मनाने चर्चेची अपेक्षा व्यक्त केली. या अधिवेशनात मी तुमचे आणि सर्व खासदारांचे स्वागत करतो, असे ते म्हणाले. आजच्या जागतिक परिस्थितीत भारतासाठी अनेक संधी आहेत. या सत्रामुळे देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, मेड इन इंडिया लस याबद्दल जगामध्ये विश्वास निर्माण होतो असं देखील ते म्हणाले.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी एक महत्वपूर्ण ट्वीट केले आहे. ते म्हणाले, पेगॅसस वरून विरोधी पक्षानं सभागृहात असं वर्तन ठेवावं की सभागृह चालेल. देशापुढे ह्यासोबत अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी आहे, महागाई आहे, शेतीबाबत आहेत. त्यावर सरकार काय करणार आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका काय आहे हे साऱ्या देशाला जाणून घ्यायचं आहे. हे अधिवेशन वाया जाऊ देऊ नये.