डॉ.शामाप्रसाद मुखर्जीनी ब्रिटीशांना पत्र दिलेच नाही, मग खा. संजय राऊताचा तोंडाळपणा कशासाठी?

राम कुलकर्णी : शिल्लक शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत (Sanjay Raut) खोटं बोलण्यात आणि असत्य पण सत्य असल्याचा आव आणत पटवुन देण्यात वस्ताद म्हणून राजकिय क्षेत्रात ओळखले जावु लागले आहेत. प्रसिद्धीच्या नादात तोंडाला येईल ते बोलणं, बेछुट आरोप करणं आणि द्वेषाची भाषा करत राजकिय संस्कृतीच ज्या माणसानं बिघडुन टाकली त्या राऊतांनी परवा दिल्लीत बसुन पुर्व इतिहासाचा धातांड दाखला देत डॉ.शामाप्रसाद मुखर्जीनांच (Shamaprasad Mukharjee) मरणोत्तर वेदना होतील असं वक्तव्य केलं.

ब्रिटिशांना म्हणे मुखर्जीनं त्या काळात चलो जाव आंदोलन चिरडुन टाकण्याचे पत्र दिलं. त्याचा कुठलाही पुरावा राऊताकडे नाही. असं पत्र मुखर्जीनं कधीच दिलेलं नाही. एव्हाना त्या काळात ब्रिटिशाच्या तुरूंगात देखील काही काळ मुखर्जी होते. असं असताना विरोधकांना केवळ बदनाम करण्यासाठी त्यांच्या पुर्वसुत्राची नावं घ्यायची, खोटे दाखले देवुन बदनामी करायची हा मुळ धंदा राऊतांचा आहे. वास्तविक पहाता त्यांच्या एकाही शब्दावर राज्यातील जनतेचा विश्वास नाही तो भाग वेगळा. पण आपण राजकारणात वेगळे कसे आहोत?हे दाखवण्यासाठी तोंडाळपणा सुरू असंच म्हणावे लागेल.

राजकारणात सत्ताधार्‍याच्या विरोधात आरोप करायचा झाला तर अलीकडे त्याची सत्यता न पहाता खोटे बोलायचं ज्याचा कुठलाही पुरावा नसतो. पण केवळ सनसनाटी निर्माण करायची आणि आपण काहीतरी वेगळंच करू शकतो या आविर्भावात बोलुन जायचं. हा धंदा शिल्लक शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी पत्करलेला दिसुन येतो. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने भाजपाने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या शहिदांच्या स्मृतीसाठी म्हणून देशभरात वेगवेगळे राष्ट्रभक्तीचे कार्यक्रम हाती घेतले. त्यावर टिका करताना भाजप तथा संघ परिवाराचा स्वातंत्र्य पुर्व चळवळीत कुठलाही सहभाग नसल्याचे जाहिरपणे राऊत म्हणाले.

एवढ्यावर थांबणार ते राऊत कुठले? त्यांनी चक्क ब्रिटिशांना तत्कालीन काळात डॉ.शामाप्रसाद मुखर्जींनी चले जाव आंदोलन चिरडुन टाका अशा प्रकारचे पत्र दिल्याचे राऊतांनी भीमदेवी थाटात सांगितले. खरं तर लोकांची केवळ दिशाभुल करण्यासाठी म्हणून विरोधक जेव्हा खोटेपणाचा आव आणतात त्यावेळी सामान्य माणसाला मात्र त्या गोष्टी मुळात पटत नाहीत. संघ परिवार स्वातंत्र्य चळवळीचा भाग तत्कालीन काळात होता हे त्रिकालाबाधीत सत्य आहेच पण तत्कालीन काळात हिंदुत्ववाद्यांची राष्ट्रभक्ती विशेषत: काँग्रेसीवाल्यांनी लोकांच्या पुढे येवु दिली नाही. पण स्वातंत्र्यासाठी चळवळ जेव्हा सुरू होती त्या काळात संघ संस्थापक कै.हेडगेवार 1925 च्या अगोदर हेच मुळात काँग्रेसमध्ये होते. साहजिकच त्या चळवळीचा भाग होते. तदनंतर काँग्रेस विचारासोबत मतभेद झाले. त्यातुन त्यांनी हिंदु एकजुट व्हावी म्हणून संघाची स्थापना केली. एक गोष्ट निश्चित आहे संघ परिवारातील कार्यकर्ता हा खर्‍या अर्थाने संजय राऊतांच्या पत्राचाळीसारखा लुटारू नसतो हे त्रिकालाबाधित सत्य. त्या राऊतांनी पत्राचाळीत मराठी सुशिक्षित बेरोजगारांना देशोधडीला पाठवलं आणि केवळ मलिदा लाटण्यासाठी गैरव्यवहार केला. पण आपल्यावर भ्रष्टाचाराचे जेव्हा डाग असतात अशी माणसं छाती काढून दुसर्‍याकडे बोट दाखवतात तो निसर्गाचा नियमच आहे. संजय राऊत हा माणुस किती खोटे बोलतो? तेही जगाच्या समोर. हे काल उघडं पडलं. शामाप्रसाद मुखर्जीनं ब्रिटिशांना चले जाव आंदोलन चिरडुन टाकण्यासाठी पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. गंमत बघा, एक तर मुखर्जी स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री म्हणून होते. जर मग अशा प्रकारचे पत्र ब्रिटिशांना दिलं असतं तर नेहरूंनी मंत्रीमंडळात त्यांना घेतलं असतं का? अर्थात मंत्रीमंडळात त्यांनी काश्मिरमधील 370 कलम लावु नये अशी भुमिका त्यांनी घेतली होती. सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्या मुद्यावरून मंत्री पदाचा राजीनामा मुखर्जीनं दिला होता.

खरं तर इतिहास माहिती नसेल तर मागची पाने चाळत वाचन करायला हवा. पण प्रकांड पंडित आपणच आहोत आणि आपल्यापेक्षा इतर कुणाची ज्ञान मोठं नाही हा ज्यांच्या अंगी अहंकार असतो, जे स्वत:ला पत्र पंडित समजतात अशांचा खोटारडेपणा उघडा पडल्याशिवाय रहात नाही. खरं तर त्या काळात मुखर्जींना ब्रिटिशांनी जेलमध्ये टाकले होतं असे बरेचजण सांगतात. मग त्यांना पत्र देण्याचा संबंध येतो कसा? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तत्कालीन काळात ज्या काही राष्ट्रभक्तीच्या चळवळी झाल्या त्यात कुणी कुणाला पत्र दिले याचे पुरावे आजही सापडतात पण ब्रिटिशांना अशा प्रकारचे पत्र मुखर्जीनं दिलं हा पुरावा कुठेही नाही. पण बिनडोकपणाची भाषा बोलायची आणि छाती बदडुन घ्यायची हा मुळ स्वभाव राऊतांचा म्हणावा लागेल. खरं तर त्यांनी तशा प्रकारचे पत्र हा पुरावा माध्यमांच्या समोर द्यायला हवा. भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी तर असं पत्र तुम्ही द्या, आम्ही प्रवक्ते पदाचा राजीनामा देतो आणि पत्र नसेल तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या असे खुले आवाहन त्यांना दिले होते. पण ज्यांच्या डोक्यात केवळ प्रसिद्धीच्या लाटा उसळलेल्या असतात अशी माणसं ज्यांच्यातला अहंकार रावणापेक्षा आजच्या काळात जास्तच म्हणावा लागेल. स्वातंत्र्यपुर्व काळात तत्कालीन व्यवस्थेत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी जणु काही आम्हीच सारं काही केलं या भुमिकेतुन अजुनही काँग्रेस बाहेर पडलेली नाही. महात्मा गांधी यांनी दिलेला लढा सर्व समावेशक आणि देशातील सर्वांना सोबत घेवुनच होता. त्या लढ्याचे पाईक संघ परिवाराचे तत्कालीन काळात अनेक कार्यकर्ते आहेत. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या काँग्रेसवाल्यांनी भाजपवाल्यांच्या योगदानाचा विसर लोकांना पडावा म्हणून त्याची चर्चा माध्यमातून लोकांच्या पुढे येवु दिलेली नाही हे तितकंच महत्वाचं.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी 1940दरम्यान म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर अंत्योदय अर्थात शेवटच्या माणसासाठी काम केलं पाहिजे हा विचार मांडला. पण त्यांनी दाखवुन दिलेला मार्ग काँग्रेसवाल्यांनी कधीच लोकांच्या पुढे येवु दिला नाही. देशात व्यवस्था बदल झाली. मोदी नेतृत्वाचा उदय झाला. त्यावेळी मात्र डॉ.शामाप्रसाद मुखर्जी असतील किंवा पंडीत दीनदयाळ उपाध्याय असतील यांच्या विचाराची देशात सर्वदुर चर्चा होवु लागली. राष्ट्रभक्त फक्त काँग्रेसकडेच असा एक गैरसमज त्यांच्या अनुयायांचा होवुन बसलेला आहे पण काश्मिरमध्ये 370 कलम लावु नका ही मागणी करत डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली ते काश्मिर असा प्रवास केला. तिथे जावुन चळवळ उभा केली. या मागणीसाठी लढा देताना त्यांचा बळी गेला. म्हणूनच नंतरच्या काळात 370 कलमाची लढाई भाजप जेव्हा लढायचं तेव्हा मुखर्जीचं बलिदान व्यर्थ जावु नये त्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष केला. अर्थात एक दिवस नियतीला मान्य होता तो आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर देशाची सुत्रे हाती घेतली. मग काश्मिरमधील 370 कलम हटवुन दाखवलं. खरं तर शामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अनेक वर्षे लागली. पण भाजपाने अखेर ते करूनच दाखवलं. या सार्‍या गोष्टी बिचार्‍या संजय राऊतांना माहिती कसं असणार? कारण केवळ द्वेषाचं राजकारण करायचं आणि विरोधकांवर चिखलफेक करत रोज बदनामी कशी होईल? एवढाच हिशोब डोक्यात ठेवायचा. ना कुणाचा इतिहास वाचायचा ना चाळुन पहायचा. तोंडाला येईल ते तोंड चोपडेपणा करत केवळ मालकाला खुष करण्यासाठी चाकरी करायची एवढंच राऊतांना माहितीय. त्यापेक्षा सकारात्मक पाहण्याची दृष्टी देखील त्यांच्याकडे नाही.