कॉंग्रेसमध्ये पुन्हा भूकंप : नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र झाले सुरु 

satyajeet tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्या नव्या राजकीय इनिंगचा प्रारंभ झाला आहे. विजय मिळवल्यानंतर काही दिवसापूर्वी  झालेल्या पत्रकार परिषदेला ते सामोरे गेले आणि त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर परखड भाष्य केलं. यावेळी कॉंग्रेसमधील नेत्यांवर तोफ डागली आहे.

दरम्यान, यानंतर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीमाना दिल्याने कॉंग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. थोरात यांच्या राजीनाम्यानंतर आता नाशकात आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे.तांबे कुटुंबियांना पक्षाने दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.

नाशिकच्या पेठ तालुक्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून यामध्ये तालुकाध्यक्ष विशाल जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, एनएसयूआयचे अध्यक्ष ललित मानभाव, सहकार सेलचे अध्यक्ष कुमार भोंडवे, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष रेखा भोये, महिला शहराध्यक्ष रुख्मिणी गाडर, गीता जाधव, विकास सातपुते, राहुल बिरारी, दिनेश भोये, कैलास गाडर आदींचा समावेश आहे. या सामूहिक राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे यांना प्रदेश काँग्रेसने अपमानास्पद दिली असून, त्याचा निषेधार्थ आम्ही सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत. आम्ही केलेली डिजिटल सभासद नोंदणी व बूथ विसर्जित करत असल्याचे म्हटले आहे. या पदाधिकाऱ्यांनी पेठ तालुका काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबतही आपला रोष व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीने पेठ तालुकाध्यक्ष निवडीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा कोणताही प्रोटोकॉल पाळला नसल्याचाही आरोप केला आहे. पेठ तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे हे राजीनामा पत्र जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्याकडे पाठविण्यात आले असून, त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही सादर करण्यात आली आहे.