विठ्ठलाचं दर्शन घेताना धोतरच घाला!, पंढरपुरात ड्रेसकोड लागू करावा, संभाजी भिडेंची मागणी

Sambhaji Bhide Controversial Statement: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असतात. नुकतेच स्वातंत्र्यदिन, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांवरुन संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर आता त्यांनी पंढरपुरातील वारकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे.

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांनी धोतर घालूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी यावं, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर पंढरपुरात ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणीही सुद्धा भिडे यांनी केली आहे.

पंंढरपूरमध्ये माध्यमांसोबत संवाद साधताना संभाजी भिडे म्हणाले की, मला संत, महंतांना आणि वारकरी मंडळींना सांगायचं आहे, की पँट घालून पंढरपूरला यायचं नाही, तसेच विठ्ठल मंदिरात सुद्धा प्रवेश करायचा नाही. वारकरी व विठ्ठल भक्तांनी धोतरच घालूनच मंदिरात यावे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. भिडे म्हणाले की, धोतर हे सर्व संताचा, महंतांचा पोशाख आहे. पँट हे ब्रिटिशांचा वेश आहे. त्यामुळे संस्कृती राखून वारकरी भक्तांनी पंढरपुरात व मंदिरात यावे. वारीतून येताना पँट शर्ट असा वेश नको, पंढरपूरमध्ये तातडीने ड्रेसकोड लागू करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा संभाजी भिडे यांनी केली आहे.