ईडी व आयकर विभागाने नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करून त्यांचा शोध घ्यावा – सोमय्या

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. ठाकरे सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर शुक्रवारी किरीट सोमय्या (kirit somayya) यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवारासाठी कोट्यवधी रुपयांचे मनी लाँड्रिंग करणारे हवाला एंट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी गायब आहेत,  ईडी व आयकर विभागाने चतुर्वेदी यांना फरार घोषित करून त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ठाकरे परिवार आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध स्पष्ट आहे, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टिज एलएलपी, वत्सला ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, प्राईम टेक्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्या स्थापन केल्या. नंदकिशोर चतुर्वेदी हे कोमो स्टॉक्समध्ये २०२० साली तर वत्सला ट्रेड व प्राईम टेक्समध्ये मार्च २०१७ मध्ये भागिदार झाले.

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम्सबाबत गूढ आहे. ही एक बांधकाम कंपनी आहे व तिचा प्रकल्प मुंबईत दादरला शिवाजी पार्क येथे आहे. कंपनीचा पत्ता श्रीजी प्लाझा, लिकिंग रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई आहे. रेकॉर्डनुसार श्रीजी होम्सचे मालक श्रीधर माधव पाटणकर आहेत व अन्य दोन कंपन्या आहेत. प्रत्यक्षात श्रीजी होम्सचे खरे मालक कोण आहेत, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनी केला पाहिजे. श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम्स या कंपनीमध्ये २९ कोटी ६२ लाख रुपये कोठून आले? हा पैसा बेनामी आहे की, मनी लाँड्रिंग करून श्रीजी होम्समध्ये आला!? असा सवाल देखील त्यांनी केलाय.