‘लेक माझी लाडकी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार सतेज पाटील यांची मागणी

Lek Majhi Ladki Yojna: मुलींच्या सक्षमीकरणाकरीता राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘लेक माझी लाडकी’योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने किती निधीची तरतूद केली असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या योजनेकरीता नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले असून त्या अंतर्गत निधीची तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले.

आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी हिवाळी अधिवेशनात ‘लेक माझी लाडकी’च्या अंमलबजावणीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. मुलींच्या सक्षमीकरणाकरीता लेक माझी लाडकी या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली असून यात पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, पहिलीत गेल्यावर ६ हजार, सहावीत गेल्यावर ७ हजार, ११ वीत गेल्यावर ८ हजार, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. निधीअभावी या योजनेची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही हे खरे आहे काय? शासनाने यासंदर्भात निधीची तरतूद करुन या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेबाबत कोणती कार्यवाही केली? असे सवाल आमदार पाटील यांनी केले.

यावर दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या "लेक लाडकी" या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या १ अथवा २ मुलींना तसेच १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. याशिवाय दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगी अथवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अधिनस्त क्षेत्रिय यंत्रणांना योजने संदर्भात अर्ज स्वीकारण्याबाबत कळविण्यात आले असून योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू केली आहे तसेच या योजनेकरीता नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले असून त्या अंतर्गत निधीची तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-