मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फूड पॅकेटस, ब्लॅकेटस्, कंटेनर यासह मदत साहित्याचा ओघ

जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधांसाठी साहित्य इर्शाळगड वाडी घटनास्थळाकडे रवाना

अलिबाग  :- इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरीकांसाठी घटना स्थळावर तात्पुरते निवारे, अन्न, मदत साहित्य यांची तातडीने उपलब्धता केली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रायगड जिल्ह्यातील उद्योग व संस्थापुढे आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुविधा निर्माण करण्यासाठी साहित्य घटनास्थळाकडे पाठविले जात आहेत.

यामध्ये मदत साहित्य व निवाऱ्यासाठी घटनास्थळाच्या बेसकॅम्पकडे २० X १० आकाराचे ४ कंटेनर, ४० X १० चे २ व इतर दोन कंटेनर पाठविण्यात येत आहेत. सदर कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी, जेएसडब्लू समूह येथून रवाना झाले आहे. चौक , खालापूर येथील तात्परती निवाराव्यवस्था केली जात आहे.

घटनास्थळ हे उंचावर असून मशिनरी साहित्या पोहचत नसल्याने दरड कोसळल्याने निर्माण झालेले मातीचे ढिगारे दूर करणेसाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह दुपारनंतर घटना स्थळी पोहोचले असून सकाळ पासून मदत कार्यात असलेल्यांना त्यामुळे विश्रांती मिळणार आहे.

दुर्घटनाग्रस्त भागात विद्युत पुरवठा होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत अभियंता, महावितरण यांचे पथक पाठविण्यात आले आहे. यासह यंत्रणेसाठी तात्पुरती निवारा व्यवस्था, अन्न व पिण्याच्या पाण्‍याचा पुरवठा यादृष्टीने महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व त्यांची यंत्रणा काम करत आहे. तेथे साहित्य सामुग्री व अति महत्वाच्या व्यक्तींच्या समन्वयन, हेलिपॅड आदी सुविधा तयार केल्या जात आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अलिबाग यांचे कडून जखमींवर उपचार साठी सुविधा देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. स्वत: विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. म्हसे दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर रात्री दीड वाजता घटना स्थळी प्रत्यक्षात पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय अधिकारी श्री. अजित नैराळे. खालापूर तहसिलदार अयुब तांबोळी यांनी रात्री परिस्थितीचा अंदाज घेत, बचावकार्यासाठी आवश्यक साधन सामग्री, मनुष्यबळ कराच्या उपाययोजना तयारी केली.

महसूल, जिल्हा परिषद व पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरी संरक्षण दल मुंबई येथून दोन पथके, एनडिआरएफची चार पथके १५० मनुष्यबळासह घटनास्थळी असून इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी , स्वयंसेवी संस्थांचे सदस्यख्‍ युवा मंडळे, ट्रेकर्स् ग्रपचे प्रतिनिधी असे दुपारनंतर जवळपास ७०० जण मदत कार्यात सहभागी होते. पुणे येथून एनडिआरएफचे पथक पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहाचले होते. नवी महानगरपालिका अग्निशमन दलाचे पथक, पनवेल नगरपालिका येथून 44 अधिकारी कर्मचारी 2 जेसीबी पाठविण्यात आले तसेच 8 ॲम्बुलन्स, कर्जत येथून कळम, आंबिवली, मोहिल आदी प्राथमिक आरोग्यकेंद्रचे वैद्यकीय पथके घटनास्थळी पहाटेच पोहोचले होते. त्यानंतर देखील आरोग्य विभागाचे इतर ठिकाणचे वैद्यकिय अधिकारी कर्मचारी यांना पाठविण्ण्यात आले आहे.

आज भर पावसात मदत कार्य सुरु असून काल सर्वाधिक 198 मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्हयात झाली यावेळी कोकण विभागाच्या सरासरी 136.7 मि.मी. पाऊस झाला आहे. अशावेळी दुर्घटनास्थळी वाहने पोहोचण्यात अडचण असल्याने मदत कार्य थांबू नये यासाठी माहिती असलेल्या स्थानिकांची व संस्थांची मदत घेतली जात आहे. यामध्ये युवा संघटना, महाराष्ट्र सह्याद्री ट्रेकर ग्रुप्स, यशवंती हॅकर्स, विविध ट्रेकर्सचा देखील सहभाग आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर ३००० फूड पॅकेटस उपलब्ध करण्यात आले आहेत. यासह घटनास्थळावर पाणी बॉटल्स, ब्लॅंकेट्स, टॉर्च, मदतसाहित्य, चादरी, बिस्कीट तसेच इतर प्रथम उपचार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मदतीसाठी शासकिय विभागांची, संघटना व स्वयंसेवी संस्थांची मदत पथके रवाना झाली. यामध्ये पुणे, अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबई व येथील सहभाग आहे. विविध शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांच्याकडून मदत कार्य करण्यात येत आहे .