शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा;अशोक चव्हाण यांची मागणी

Ashok chavhan- राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज विधानसभेत केली.

वैद्यकीय संशोधन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत त्यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २ ऑक्टोबर रोजी २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत या रुग्णालयातील अव्यवस्थेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावेळी चव्हाण म्हणाले की, या रुग्णालयात एकूण ४६१ पदे मंजूर असून, त्यापैकी ११७ पदे रिक्त आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा नव्हता, असा मंत्र्यांचा दावा आहे. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी बाहेरून औषधे आणावे लागत असल्याची तक्रार जाहीरपणे मांडली आहे.

त्यादिवशी नवजात बालकांच्या अतिदक्षता केंद्रात एकावेळी ७० बालके दाखल होती. एका इन्क्युबेटरमध्ये तीन-तीन बालके ठेवण्यात आलेली होती. त्या ठिकाणी केवळ ३ परिचारिका कार्यरत होत्या. या रुग्णालयातील अनेक परिचारिकांची बदली झाली. मात्र, त्यांच्या रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. रुग्णालयात पुरेसे डॉक्टर्स देखील नाहीत. विविध वैद्यकीय चाचण्या करणारी उपकरणे कार्यरत नव्हती. रुग्णालयात नियमित स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी होती. सर्वसाधारणपणे राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांची व जिल्हा सामान्य रुग्णालयांची हीच परिस्थिती आहे.

या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने तातडीने पुरेशा निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. आरोग्य सेवा हा विषय गांभिर्याने व प्राधान्याने हाताळण्याची आवश्यकता आहे. रुग्णसेवेसाठी मोठी गुंतवणूक केली जाते. पदे रिक्त त्याचा योग्य उपयोग होणार नाही. घटना घडल्यानंतर मंत्री येतात, पालकमंत्री येतात आणि कालांतराने सारे शांत होते. हे टाळले पाहिजे व नांदेडसारख्या घटना राज्यात पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे, अशी भूमिका अशोकराव चव्हाण यांनी या चर्चेदरम्यान मांडली.

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असणारा ऋषभ पंत पुनरागमन करणार

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

धीरज साहू यांच्याकडे इतका अमाप काळा पैसा असेल तर दुकानाच्या मालकाकडे किती काळा पैसा असेल ?