शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय – एकनाथ शिंदे

मुंबई : शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते.

हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून हिरकणी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. केंद्र सरकारने (Central Government)काही दिवसांपूर्वी इंधनावरील कपात केली त्याच धर्तीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

आगामी कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या समृद्धी महामार्गातून (Samruddhi Mahamarg)मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळेल. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे प्राधान्य असेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांना गती देणार आहेत. तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे एकांगी निर्णय न घेता सर्वांच्या हितासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

राज्य शासन सर्वांना बरोबर घेऊन सर्वधर्मीयांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री (CM) शिंदे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन सर्वसामान्यांची कामे लवकर होण्यासाठी आमचे सरकार भर देणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.