मंगळागौरीला सार्वजनिक स्वरुप देऊन महिला सक्षमीकरण करणार; मनिषा कायंदे व शीतल म्हात्रे यांचा निर्धार

मुंबई –  मंगळागौरीचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे या माध्यमातून महिलांचे संघटन करण्याचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा व त्यांच्यापर्यंत सरकारची कामगिरी पोचवण्याचा निर्णय शिवसेनेच्या महिला आघाडीने घेतला आहे.  त्यामुळे मंगळागौरीला सार्वजनिक स्वरुप देण्याचा महिला आघाडीने निर्णय घेतला आहे.  शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे महिलांचे जागरण करण्यात येणार आहे. महिलांसंबंधीच्या विविध विषयांचा उहापोह या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सचिव आमदार प्रा. मनिषा कायंदे व प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Manisha Kayande and  Sheetal Mhatre) यांनी बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंगळागौरीचा एक कार्यक्रम मुलुंडला संपन्न झाला, पुढील कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. महिला वकिल, डॉक्टर, स्वयंसेवी संस्थामध्ये कार्यरत असलेल्या महिला यांचा यावेळी  सत्कार करण्यात येईल व त्यांची प्रबोधनपर भाषणे महिलांसाठी आयोजित करण्यात येतील. मंगळागौरी का साजरी केली जाते हे जगासमोर नेऊ ,   या माध्यमातून महिलांचे एकत्रिकरण करणार, महिलांना शारीरिक व्यायाम व विरंगुळा या दोन्ही बाबी या मंगळागौरीच्या कार्यक्रमातून मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठमोळी हिंदू संस्कृती सर्वांसमोर नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती आ. कायंदे यांनी दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. शिंदे यांच्याकडून महिलांना प्राधान्य दिले जात आहे. महिलांचे सक्षणीकरण करण्याबाबत सरकारची भूमिका,  सरकार करत असलेले कार्य आम्ही या माध्यमातून  समोर आणू असे त्या म्हणाल्या.  शिवसेनेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना नेतेपद दिले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व खासदार भावना गवळी सध्या शिवसेना नेतेपदी आहेत. तब्बल आठ महिला उपनेते पदी आहेत. ळी शिवसेनेत आठ महिला उप नेत्या कार्यरत

 कोणत्याही प्रसंगातील पीडित महिलेला मदत देण्यासाठी शिवसेना पक्ष शाखांच्या माध्यमातून नेहमी कार्यरत आहे.  महिला अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, मात्र असे प्रकार घडल्यासबाबत केवळ गुन्हे दाखल करुन चालणार नाही, त्वरित तपास करण्यास प्राधान्य, केवळ जलदगती न्यायालय नव्हे तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची मागणी आम्ही केली आहे. सीसीटीव्हीचे जाळे वाढवले जात आहेत. राज्याचे सर्वंकष नवीन महिला धोरण आखले जात आहे, महिला अत्याचाराच्या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. बलात्कारासारख्या घटनांमध्ये राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या.  

शिवसेनेच्या प्रवक्त्या  शीतल म्हात्रे म्हणाल्या, मुंबईतील महिला  देशात सर्वात जास्त महिला सुरक्षित आहेत.  सरकार महिला सुरक्षिततेची  खबरदारी घेत आहे.  सर्व धर्मियांचे सण सुरक्षित होण्यासाठी सरकार व पक्ष कटीबध्द  असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी कमी दरात बस सोडणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. महिला दहीहंडी पथकांसाठी वेगळी शिबिरे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  सर्व सण सुरक्षित व जोमात होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सावाला सार्वजनिक स्वरुप दिले आम्ही विविध सणांना सार्वजनिक स्वरुप देऊ व त्या माध्यमातून समाजातील एकोपा वाढवू असे त्या म्हणाल्या.  मंगळागौरी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने  मुस्लिम महिला येतात ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक ठरु शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.