जम्मू कश्मीर मधील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ७ नोव्हेंबर रोजी उद्घाटन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Jammu-Kashmir : जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कन्याकुमारी ते काश्मीर मार्गावरील सर्व नद्यांचे पाणी एकत्रित करून शिवरायांच्या मूर्तीचा जलाभिषेक करीत पूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि लष्करी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पूजन होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे विश्वस्त अभयराज शिरोळे, ॲड. मिलिंद पवार, अखिल झांजले उपस्थित होते. जम्मू काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा, मैसूर येथील येडतोरे मठाचे पिठाधिपती प.पू. श्री श्री शंकर भारती महास्वामीजी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिनांक २० ऑक्टोबर रोजी मुंबई राजभवन येथून ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करीत कुपवाडा येथे रवाना करण्यात आला. साधारण २२०० किलोमीटरचा प्रवास करून हा पुतळा कुपवाडा येथे पोहोचला. तेथील जवानांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभूतपूर्व स्वागत केले.

राजेश क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्र शासन कुपवाडा येथील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करेल. स्मारक स्थळी काही दिवसात भव्य दालन उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास दृकश्राव्य माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. तसेच शस्त्रांचे प्रदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची माहिती या दालनात असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर मान्यवर दिनांक ७ रोजी कुपवाड्याला पोचणार आहेत त्यानंतर हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असल्यामुळे आम्ही सुद्धा आम्ही पुणेकर संस्थेबरोबर या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहोत आणि या कार्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही करत आहोत.

हेमंत जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभारण्यात येणाऱ्या ध्वजाचे पूजन देखील कार्यक्रमात होणार आहे. यावेळी कन्याकुमारी ते काश्मीर मार्गावरील सर्व नद्यांचे पाणी एकत्रित करून सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक केले जाईल. त्यानंतर हे स्थळ सर्वांना पाहण्यासाठी खुले होणार आहे.

यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहे याचे औचित्य साधून याच ठिकाणी जवानांसोबत दिवाळी फराळ कार्यक्रम मुख्यमंत्री समवेत साजरा केला जाणार आहे.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे