‘जेव्हापासून मोदींचे सरकार केंद्रात आले आहे, तेव्हापासून आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहोत’

नवी दिल्ली-  महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.

इंधनाव्यतिरिक्त, महागड्या गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्यांनाही सरकारने दिलासा दिला असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देऊ. यामुळे आमच्या माता-भगिनींना मदत होईल. असं त्या म्हणाल्या.

जेव्हापासून पंतप्रधान मोदींचे सरकार केंद्रात आले आहे, तेव्हापासून आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी आम्ही काही पावले उचलली आहेत. याचाच परिणाम असा झाला आहे की, आमच्या कार्यकाळातील सरासरी महागाई मागील सरकारपेक्षा कमी आहे. सध्या जग कठीण काळातून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जग कोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच युक्रेनचे संकट उद्भवले, त्यामुळे पुरवठा साखळी आणि अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे अनेक देशांमध्ये महागाई आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे असं त्या म्हणाल्या.