पुण्यात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की 

पुणे – खडकी (Khadki) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या साउंडवर कारवाई करणाऱ्या टोळक्याने गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (Sub-Inspector of Police) धक्काबुक्की केल्याची घटना खडकीतील मुळा रस्ता परिसरात घडली आहे.

मुळा रस्त्यावरील त्यागी बंगला परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास साउंडवर मोठ्या आवाजात गाणी लावून काही तरुण नृत्य करत होते. कोणती गाणी वाजवायची, या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यामुळे गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना हटकवले असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केली. या प्रकरणी पाच जणांना खडकी पोलिसांनी अटक केली.

सुमित सुभाष मिश्रा (वय २०), रसल एल्वीस जॉर्ज (वय २७), ऋषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (वय २३), सिद्धार्थ महादेव लोहान (वय २४, सर्व रा. मुळा रस्ता, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.