‘धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो की, एकनाथ शिंदे सोडला तर एकही बंडखोर आमदार निवडून येणार नाही’

संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सध्या मोठे घमासान सुरु आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर तुटून पडत असल्याचे दिसून येत असताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले,  शिवसेना फोडण्याचं तुम्ही पाप करीत असून ते त्यांना भरावं लागणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यात चित्रपटात दाखवलं आहे की, गद्दारांना क्षमा नाही. मग हे नेमकं काय चाललंय,? असा सवाल  खैरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो की, एकनाथ शिंदे सोडला तर एक ही बंडखोर आमदार निवडून येणार नाही. बाळासाहेबांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासोबत असंच होतंय. असं म्हणत एकनाथ शिंदे गावाकडे शेतीच करायला जाणार आहेत. असा इशारा देखील त्यांनी दिला.

आम्ही देखील ४० वर्ष शिवसेनेत रक्ताचं पाणी केलं आहे. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना फोडायला निघाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही.  अब्दुल सत्तार म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यसमोर कुणाचाच बाण टिकणार नाही. यावर बोलताना म्हणाले की, हा धनुष्य फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा असून त्यांनी शिवसेनेची घटना वाचावी, असाही सल्ला खैरे यांनी दिला आहे.