जन्मदात्या वडिलांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याचा राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप, गुन्हा दाखल

Sandeep kshirsagar : बीडच्या राजकारणातील (Beed Politics) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले? असे म्हणत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करत घराबाहेर हाकलून दिल्याची माहिती मिळत आहे. तसा आरोपच संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी केला आहे.

बीडच्या नगर रोडवरील निवासस्थानी मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला असून, या प्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात आमदार संदीप क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी, 11 एप्रिल रोजी माझ्या बहिणी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी आल्या होत्या. त्यावेळी आमदार संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांनी, तुम्ही तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले? असे म्हणत माझी कॉलर धरून धक्काबुक्की केली. माझ्यासह माझ्या बहिणींनाही घराबाहेर हाकलून दिले.

त्यामुळे रवींद्र क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघांविरोधात कलम 323, 504, 506, 34 भादंविनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुरले करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर बीडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.