“महाविकास आघाडीबरोबर अजित पवारांचा श्वास गुदमरतोय…”, आमदार रवी राणा यांचे लक्षवेधी भाष्य

अमरावती- महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचे सह्या पत्र असून योग्य वेळी ते राज्यपालांकडे हे पत्र सोपवणार असल्याचीही चर्चा आहे. अशातच या प्रकरणी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. ते सोमवारी (१७ एप्रिल) अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते.

रवी राणा म्हणाले, “अजित पवारांनी जेव्हा पहाटे पहाटे शपथ घेतली, तेव्हाही मी १० दिवस अगोदरच सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सरकार स्थापन करणार आहे. मात्र, शरद पवारांवरील धर्मसंकटामुळे तिथं अडचण आली. आता अजित पवार यांची ३३ महिने महाविकास आघाडीबरोबर राहून घुसमट झाली आहे. त्यांचा श्वास गुदमरतो आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील आपआपसातील संबंध चांगले आहेत. ते एकमेकांशी जुळवून घेतात, एकमेकांना सांभाळून घेतात हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे.”

“देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर अजित पवारांचाही विश्वास आहे. अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारमध्ये मन लावून काम केलं नव्हतं. कारण ते सरकार कामच करत नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या एकेरी धोरणामुळे अजित पवारांनी पाहिलेलं स्वप्न अर्धवट राहिले. त्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर जाऊन राहिलेलं अर्धवट स्वप्न पूर्ण करतील, असं माझं भाकीत आहे.” असेही आमदार रवी राणा यांनी शेवटी म्हटले आहे.