मुख्यमंत्र्यांची तिरकी चाल; १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दल राज्यपालांना पत्र

Mumbai – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं केलेली राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांची शिफारस मागे घेण्यासंदर्भात पत्र पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जुनी नावं मागे घेऊन शिंदे सरकारकडून आता नवीन नावं पाठवली जाणार असल्याचं देखील सांगितले जात आहे. विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून आता शिंदे-फडणवीस १२ आमदारांची नावं सुचवणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केलेली शिफारस मागे घेतली आहे. आधीच्या सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी केलेल्या नावांची शिफारस मागे घेत असल्याचं पत्रात म्हटलं आहे. शिंदे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिलेल्या पत्रात जुनी शिफारस मागे घेऊन विधान परिषदेवरील १२ जागांसाठी नवीन नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडून केली जाईल, असं म्हटलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.