केंद्र सरकारला अग्निपथ योजना मागे घेण्यास भाग पाडू; काँग्रेस पक्ष तरुणांसोबत – पटोले

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे चित्र देशभरात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु असून विधान परिषद निवडणुकीतही (Legislative Council elections) या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून वेळ आली की ही माहिती समोर आणू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार सीबीआय आणि ईडीचा (CBI and ED) हत्यार म्हणून वापर करत असून हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या पेरल्या जात आहे परंतु बिघाडी आघाडीत नाही तर भाजपामध्ये दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाकडून अडथळे निर्माण केले जात आहेत परंतु आकड्यांच्या गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी १२ मतांची आवश्यकता आहे तर भाजपाला पाचव्या उमेदवारासाठी २२ मते लागतात. तरीही पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांच्या भरवश्यावर भाजपा विजयाचा दावा करत आहे तो यावेळी चालणार नाही. महाविकास आघाडी भक्कम असून आवश्यक असलेले संख्याबळ मविआकडे असल्याने मविआचे सहाही उमेदवार विजयी होतील.

राजनंदिनी दळवी अकॅडमीच्या प्रशिक्षक व युवकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अग्निपथ योजना (Agneepath Yojana) रद्द करावी या मागणीचे निवेदन दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजनेला देशभरातून तरुण तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरले आहेत. अशा प्रकारच्या सैन्य भरतीमुळे तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार आहे. तरुणांचा या भरतीप्रक्रियेला विरोध असून देशभर तरुणांचे आंदोलन पेटले आहे परंतु हिंसक मार्गाचा अवलंब तरुणांनी करु नये. काँग्रेस पक्ष तरुणवर्गावर अन्याय होऊ देणार नाही, आम्ही तरुणवर्गांसोबत आहेत. केंद्र सरकारने लादलेली अग्निपथ योजना मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू असा विश्वास व्यक्त केला.