धक्कादायक! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

गुरुवारी (०३ नोव्हेंबर) भारताचा शेजारी देश पाकिस्तानातून धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात (Attack On Imran Khan) आला आहे. पाकिस्तानातील मीडियानुसार, पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला, ज्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वझिराबादमधील जफर अली खान चौकात ही चित्तथरारक घटना घडली आहे.

वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान हा गोळीबार कोणी केला, हल्लेखोर कोण होते, या गोळीबारामागील त्यांचा हेतू काय होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या हल्ल्यानंतर आता तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.