कुठे फुलांची उधळण तर कुठे काकड आरती; ढोलाच्या तालात गणरायाचं आगमन

Pune – राज्यात आज घरोघरी मंगलमूर्ती मोरयाचे आगमन होत आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षांचा खंड पडल्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. पहाटे 4 वाजून 48 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत श्रींच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. सकाळपासूनच शहरात सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेश मूर्ती घरी घेऊन येणारे लोक दिसत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवासाठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणरायाची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहील, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात स्हटलं आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये धामधुमीचं वातावरण असून लेझीम आणि झांजांच्या नादात आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन होत आहे. पुणे शहरातील मानाच्या गणपतीसह प्रतिष्ठेच्या मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत होणार आहे.

मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हुतात्मा राजगुरु यांच्या परिवाराच्या हस्ते होणार आहे. सकाळी 8.15 च्या सुमारास ‘श्री’ची मिरवणूक निघाली असून संघर्ष वाद्ववृंद, श्रीराम ढोल-ताशा पथक तसेच प्रभाग बँड पथक मिरवणूकीत सहभागी झाले आहे.