पवारसाहेब हे लोकनेते आहेत, सदाभाऊ तुमचे योगदान काय ?; पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचा पलटवार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री सदाभाऊ खोत विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असल्याचे दिसून येत आहे. यातच आता खासदार शरद पवार यांच्यावर खोत यांनी आज तोफ डागली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले. त्यांचे आडनाव आगलावे करा, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. ते सोलापूरमध्ये आले असता बोलत होते.

सदाभाऊ म्हणाले की, शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले आहे. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

खोत यांनी केलेली ही टीका राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागली असून पक्षाकडून आता खोत यांनी प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आल्याने पवारसाहेबांवर टिका करुन देवेंद्र फडणवीस यांना खूश करण्यासाठी सदाभाऊ खोत अशी वक्तव्य करत आहेत हे जनतेला माहीत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. सदाभाऊ खोत यांना गोपीचंद पडळकरांची लागण झाली आहे असा खोचक टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

आतापर्यंत शांत बसलेले सदाभाऊ खोत आमदारकी मिळवण्यासाठी पवारसाहेबांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कितीही सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तरी थुंक तुमच्या तोंडावरच पडणार आहे हेही लक्षात घ्या अशा स्पष्ट शब्दात महेश तपासे यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले आहे.

सांगलीशी पवारसाहेबांचा काय संबंध? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी केला होता त्यावर बोलताना सुर्याचा किरणांशी काय संबंध असा सवाल होऊ शकतो का? पवारसाहेब हे लोकनेते आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत व देशपातळीवरच्या सामाजिक, राजकीय जीवनात पवारसाहेबांचे योगदान मोलाचे आहे. या तुलनेत सदाभाऊ तुमचे योगदान काय? आणि तुम्ही कोण विचारणारे असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.