दिल्लीच्या अबकारी पॉलिसी बाबत अण्णांचे पत्र हे दुर्दैवी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे – विजय कुंभार

Pune – दिल्लीच्या अबकारी पॉलिसी बाबत अरविंद केजरीवाल यांना अण्णा हजारे यांनी लिहलेले पत्र हे दुर्दैवी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे असे आम आदमी पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी म्हंटले आहे.

अण्णा हजारे यांच्या विषयी आपल्या मनात नितांत आदर आहे. गेले अनेक वर्षापासून अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहे. अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला असला तरी, त्यांनी आपल्या तत्वाशी आणि सिद्धांता बाबत कधीच तडजोड केलेली नाही.

अण्णांनी आज लिहलेले पत्र हा विपर्यासच आहे, हे यासाठीच म्हणावं लागेल , कारण पत्रातून दिल्ली सरकारच्या अबकारी पॉलिसी बाबत अण्णांनी संपूर्ण माहिती घेतल्याचे दिसून येत नाही.

दिल्ली सरकारच्या नव्या निती प्रमाणे विक्रेत्यांची संख्या कमी झालेली आहे. नवीन धोरणामुळे दारू विक्रेत्याला काळा बाजार करता येत नाही व या धोरणामुळे सरकारचा महसूल कैक पटीने वाढला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या धोरणामुळे दलालांना चाप बसला आहे. व मद्य प्रेमींना त्यांच्या आवडीचा ब्रँड मिळणे कठीण झाले आहे.सरकारी विक्रेत्यांची दुकाने बंद पडून संपूर्ण व्यवसाय खाजगी कंपन्यांकडे गेला आहे.

केजरीवाल सरकारच्या धोरणात पारदर्शकताअसल्यामुळे ,भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.त्यामुळे लिकर माफिया लॉबीने मनीष सिसोदिया आणि दिल्ली सरकार विरुद्ध अपप्रचार सुरू केला आहे.केंद्र सरकारने वारंवार प्रयत्न करूनही केजरीवाल सरकारची अबकारी निती लोकहिताच्या विरुद्ध आहे हे ते सिद्ध करू शकले नाहीत . या प्रकरणामुळे उलट भाजप सरकारचे दुटप्पी धोरण आणि खरा चेहरा लोकांच्या समोर उघड झाला आहे.

संपूर्ण दारू बंदी असताना गुजरात मध्ये राजरोस दारू विक्री होते , नकली , विषारी दारूमुळे माणसे मारतात, तरीही, गुजरात सरकार त्याविरुद्ध मूग गिळून गप्प बसले आहेत. इतर राज्य सरकारच्या अबकारी धोरणाची तुलना केल्यास दिल्लीचे धोरण हे सर्वात सुस्पष्ट आणि चांगले धोरण आहे हे स्पष्ट झाले आहे.

आदरणीय अण्णांना विनंती की आम आदमी पार्टी हा देशातील एकमेव सत्तेतील पक्ष आहे ज्याला सर्व सामान्यांना मूलभूत हक्क ,न्याय आणि सुविधा दिल्यामुळे व जनकल्याणकारी धोरणामुळे देश विदेशातही गौरवण्यात आले आहे. त्यामुळे अण्णा म्हणतात तशी सत्तेची नशा वगैरे सर्व चुकीचे आहे. जिथे चुकेल तिथे ते कान पकडू शकतात नव्हे तो त्यांचा अधिकार आहे .मात्र अण्णांचे पत्र हे वास्तव नाही तर तो केवळ विपर्यास आहे.