गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Deputy Cm Ajit Pawar : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार असल्याची घोषणा करुन यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी श्री शाहू विजयी गंगावेस तालीमला भेट दिली. तसेच येथील मल्लांची व वस्तादांची राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करुन वस्ताद व मल्लांशी संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता सर्जेराव पाटील, वस्ताद विश्वासदादा हारुगले, हिंदकेसरी संतोष वेताळ, महान भारत केसरी माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माणिक पाटील – चयेकर, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील- आसूर्लेकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला. अनेक तालीम बांधल्या. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम राहण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा असणाऱ्या तालीम बनवणे आवश्यक आहे. यासाठी देशभरातील चांगल्यात चांगल्या तालमीचा अभ्यास करुन त्या धर्तीवर गंगावेस तालीमचा विकास करण्यात येईल. यासाठी विविध आर्किटेक्ट कडून सर्व सोयीसुविधांचा समावेश असणारे आराखडे मागवून घ्यावेत. यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करून त्यानुसार या तालमीचा विकास करु, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तालमीत सध्या प्रशिक्षण घेत असणाऱ्या मल्लांची संख्या, वस्ताद व मल्लांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था, वय, गाव, किती वर्षापासून तालमीत प्रशिक्षण घेत आहेत, शिक्षणाची व्यवस्था आदींविषयी त्यांनी मल्लांशी संवाद साधला.

तालमीचे नूतनीकरण करताना याठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा, ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅट, माती, स्वच्छतागृह, शॉवर, मजबूत भिंती, कौले, उपलब्ध जागेत मिळणारा एफएसआय आदींबाबत विचार करा, असे सांगून तालमीचा विकास करताना हेरीटेज टच कायम ठेवा, 200 मल्लांची राहण्याची व्यवस्था करा, हवा खेळती राहील व या जागेतील वृक्षतोड होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गांगावेस तालमीत सध्या 70 मल्लांची राहण्याची सोय असून बऱ्याच मल्लांना बाहेर रहावे लागते. तालमीची पडझड होत असून तालीम व राहण्याची सोय होणे गरजेचे आहे, असे आवाहन वस्तादांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

कार विमा खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की जाणून घ्या, तुम्हाला होईल फायदा!

कोण होते डॉ. नित्या आनंद, ज्यांनी पहिली गर्भनिरोधक गोळी तयार केली; वयाच्या ९९व्या वर्षी झाले निधन

हैदराबाद कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात सर्वबाद झाली टीम