तीन गाण्यांसाठी ३ लाख घेते म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांना गौतमी पाटीलचं प्रत्युत्तर; म्हणाली, ‘ते महाराज आहेत…’

गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात. दरम्यान, काहीजण तिच्या बाजूने बोलतात तर तिचाअनेकांनी विरोध देखील केला. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कीर्तनकाप इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) गौतमी पाटीलचा चांगलाच समाचार घेतला होता. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं होतं. आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले होते.

आता यावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया पुढे आली आहे. ते महाराज आहेत. मी काय बोलणार त्यांच्याविषयी… फक्त गैरसमज नका करु. महाराजांचा गैरसमज झाला आहे. माझं मानधन एवढं नाही, असे स्पष्ट वक्तव्य गौतमीने केले आहे. ती टीव्ही९ शी बोलत होती.

गौतमी पुढे म्हणाली, प्रेक्षकांनीही हे ध्यानात घ्यावं. महाराजच नव्हे तर कुणीही काही बोललं टीका केली तरी माझं काम सुरु आहे. मला काही अडचण नाही. कारण माझं मला माहिती आहे.

मी कशी आहे. मी मानधन किती घेते ते. मी तीन गाण्याला तीन लाख घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केलं नसतं, असं गौतमी पाटील म्हणाली आहे. माझ्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. प्रेक्षक उपस्थित राहुन इन्जॉय करतात. आम्ही 11 मुली आणी अन्य अश्या 20 जणांची आमची टीम कार्यक्रमात असते. इतकी मोठ्या गर्दी होत असेल तर मी माझ्यासाठी मला संरक्षण मागणारच ना, असंही गौतमी म्हणाली आहे.