नाना पटोलेंना मिळतोय महिन्याला एक खोका..? पहा कॉंग्रेसच्याच नेत्याचा काय आहे खळबळजनक दावा

Nagpur – छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (२ मार्च) महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली मात्र या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाडी मारली. नाना पटोले सभेला गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले होते. यानंतर नाना पटोलेंनी तब्येत ठीक नसल्याचे सांगितले.

यावरून आता काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. “नाना पटोले ‘वज्रमूठ’ सभेत गैरहजर होते. त्यानंतर ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला पाहण्यास मिळतील. जबाबदारीने हे वक्तव्य करतोय,” असे आशीष देशमुख यांनी सांगितले आहे.(Ashish Deshmukh’s serious allegations against Nana Patole).

“महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन,” असे आशीष देशमुखांनी म्हटले आहे.