कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या शहरप्रमुख पदी गिरीश खत्री यांची निवड

पुणे : कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders) या राष्ट्रीय स्तरावरील व्यापारी संघटनेच्या राज्य, जिल्हा आणि शहर प्रमुख पदावरील नियुक्ती प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सचिन निवंगुणे (Sachin Niwangune) यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी, विकास मुंदडा (Vikas Mundada) यांची जिल्हाध्यक्ष पदी तर गिरीश खत्री (Girish Khatri) यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल. निवंगुणे यांची नियुक्ती संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल (Praveen Khandelwal) यांनी केली.

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ही व्यापारी संघटना ही व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करते. संघटनेची स्थापना १९९० साली झाली असून, तिचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या संघटनेचे उद्दिष्ट म्हणजे भारतीय व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी पूरक वातावरण तयार करणे, आणि व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडविणे हे आहे.

शहरातील संघटनेच्या कार्याबद्दल माहिती देताना गिरीश खत्री म्हणाले, “संघटनेने नुकतेच जिल्हा रीटेल व्यापारी संघाच्या सहाय्याने गणेशोत्सवात संयुक्त वर्गणी उपक्रम राबविला. तसेच प्लास्टिक बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांत असलेल्या तफावतीमुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेतली होती. अशाचप्रकारे व्यापारी आणि लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य संघटनेतर्फे केले जाणार आहे.’’