गोवा विधानसभा निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हापसा मतदार संघात होणार सभा

म्हापसा – जेष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांची निधनामुळे भाजपने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल सभा रद्द केल्या होत्या. काल होणारा जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम देखील यामुळेच पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, आता येत्या ११ फेब्रुवारी रोजी म्हापसा मतदारसंघात मोदींची प्रत्यक्ष सभा होणार आहे. दुसरीकडे जाहीरनामा प्रकाशन कधी होणार याबाबत लवकरच कळवले जाईल असे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे धुरंधर नेते ठिकठिकाणी प्रचार बैठकांमधून मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या 14 तारखेला गोव्यामध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तारुढ भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांनी या निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला आहे.

दरम्यान, सध्या बार्देशमधील म्हापसा मतदारसंघ हा सध्या बऱ्याच चर्चेत आहे. २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जोशुआ हे काँग्रेसच्या सुधीर कांदोळकरांचा पराभव करून विजयी झाले. यंदा बहुरंगी लढत होत असली तरीही यावेळी सुद्धा कांदोळकर व जोशुआ मध्येच मुख्य लढत होणार आहे.