असदुद्दीन ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी व्यावसायिकाने दिली 101 बोकडांची कुर्बानी

हैद्राबाद –  एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. आता ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी तेलंगणातील एका व्यावसायिकाने तब्बल 101 बोकडांची कुर्बानी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ओवेसी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेनंतर एमआयएमचे समर्थक सतत ओवेसींच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, ओवेसी यांच्या हत्येच्या हेतूनेच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ओवेसी गोळीबार प्रकरणातील आरोपी सचिन शर्मा आणि शुभम हे कट्टरतावादी विचारांचे असल्याचे समोर आले आहे.