शिवसेनेचा हेतू मला ठार मारण्याचा होता; किरीट सोमय्यांनी शेअर केला तो व्हिडीओ

पुणे : भाजपा नेते किरीट सोमय्या हे शनिवारी पुणे जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळा उघड करण्यासाठी महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली, मात्र किरीट सोमय्यांनी निवेदन नाकारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. याचदरम्यान ते पालिकेच्या पायऱ्यांवरून खाली पडले.

धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना कार्यकर्त्यांनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्या विरोधात कोणकोणती कलमे लावली जाणार याची देखील माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.

५ फेब्रुवारी शिवसेनेचा हेतू महानगरपालिकेच्या मुख्यालयात मला मारण्याचा होता, असं ट्विट करत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीचा ताफा रस्त्यावरून जात असताना एक व्यक्ती त्यांच्या गाडीमागे दगड घेऊन धावताना त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

महापालिकेच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्यांना संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्यांची भेट घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हणाले की, आज केंद्राची सुरक्षा नसती तर आज किरीट सोमय्यांना श्रद्धांजली वाहवी लागली असती.