महाभारतातील ‘शकुनी मामा’ काळाच्या पडद्याआड, गुफी पेंटल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Gufi Paintal Died – अभिनेता गुफी पेंटल यांचे सोमवारी वयाच्या 79व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. 1980 मध्ये बीआर चोप्रा यांच्या प्रसिद्ध टीव्ही शो महाभारतमध्ये त्यांनी ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारली होती. त्यांच्या पुतण्याने मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “दुर्दैवाने ते राहिले नाहीत. सकाळी 9 वाजता रुग्णालयात त्यांचे निधन झाले.”

माध्यमांतील वृत्तांनुसार वयामुळे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ढासळल्याने त्यांना सात ते आठ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. परंतु सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा (हॅरी पेंटल), सून आणि एक नातू आहे. आज दुपारी ४ वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गुफी पेंटलची फिल्मी कारकीर्द
अभिनेता गुफी पेंटलने चित्रपटांव्यतिरिक्त अनेक टीव्ही शोमध्ये काम केले होते. त्यांनी महाभारत, कानून, कोई है द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण, राधाकृष्ण, सीआयडी अशा अनेक शोमध्ये काम केले आहे. १९७५मध्ये प्रदर्शित झालेल्या रफू चक्कर या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. यानंतर त्यांनी दिल्लगी, देश विदेश आणि सुहाग यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या होत्या.