संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने चंद्रकांत पाटील बनले टीकेचे धनी 

आत्मसन्मान जागृत असलेल्या हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी पुणेकरांना गृहीत धरू नका

Pune – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहत असतात. आता संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने चंद्रकांत पाटील टीकेचे धनी बनले आहेत. (Chandrakant Patil attended the program of Sambhaji Brigade)याबाबत सौरभ वीरकर या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने आपला रोष फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला असून यापुढे मतदारांना गृहीत धरू नका असं देखील वीरकर यांनी म्हटले आहे.

फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ते म्हणतात, ब्राम्हण समाज, ब्राम्हण स्त्रियांच्याबाबतीत पुस्तकं व व्याख्यानातून अतिशय हीन विचार मांडणारे पुरुषोत्तम खेडेकर हे संभाजी ब्रिगेड नामक तोडफोड करणाऱ्या हिंसक संघटनेचे संस्थापक आहेत. संभाजी ब्रिगेड व त्यांची सहकारी असलेल्या बामसेफ संघटनेने अनेकवेळा हिंदू देवता, हिंदू धर्म, स्वा. सावरकर यांच्यासारख्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचा अत्यंत अश्लाघ्य भाषेत संतापजनक अपमान केले आहेत हे आपण जाणतोच. अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते या विषवल्ली विरोधात आपापल्यापरीने गेली अनेक वर्ष लढा देत आहेत.

परंतु स्वतःला सावरकरवादी व हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सद्य सरकार मधील पुणे शहर पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील मात्र ब्रिगेडच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना प्रतिष्ठा व पाठबळ देण्याचे काम करत आहेत… याचा नक्की अर्थ काय समजायचा ? आत्मसन्मान जागृत असलेल्या हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी पुणेकरांना कुणीही गृहीत धरू नये ! असं वीरकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सोशल मिडीयावर या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून अनेक लोकांनी वीरकर यांनी मांडलेल्या भूमिकेला समर्थन दिले आहे. आम्ही याबाबत कोथरूड भाजपची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला . याबाबत बोलताना अध्यक्ष पुनीत जोशी म्हणाले, दादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत.पुरंदरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते गेले होते त्यावेळी  विजय शिवतारे यांनी संभाजी महाराजांना अभिवादन करण्याचा आग्रह केल्यानंतर दादा त्या ठिकाणी गेले. दादा २ मिनिटात त्या ठिकाणाहून निघाले. संभाजी ब्रिगेडने सातत्याने समाजात विष कालवण्याचे काम केले आहे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात दादा लढत राहिले आहेत. मला हे आरोप म्हणजे पोलिटिकली मोटीवेटेड वाटतात असं ते म्हणाले.