काँग्रेसची साथ सोडणारे हार्दिक पटेल 2 जून रोजी आता ‘या’ पक्षात प्रवेश करणार

अहमदाबाद – गुजरात काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याबाबत मोठे विधान केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हार्दिक पटेलने 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे हे पाऊल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पटेल यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 11 जुलै 2020 रोजी त्यांची गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष (Gujarat Pradesh Congress Committee) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, 2022 पर्यंत त्यांचा पक्षाचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. काँग्रेसचा राजीनामा देताना हार्दिक पटेलने पक्षाच्या हायकमांडवर जोरदार टीका केली होती. त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून राजीनामा सुपूर्द केला. या पत्रात त्यांनी पक्षाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

आपल्या राजीनामा पत्रात हार्दिकने लिहिले आहे की, काँग्रेस पक्ष केवळ निषेधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे, तर देशातील जनतेला विरोध नको तर त्यांच्या भविष्याचा आणि आपल्या देशाचा विचार करणारा पर्याय हवा आहे . मात्र, काँग्रेसने यात केवळ अडथळा म्हणून काम केले. काँग्रेसची भूमिका केवळ केंद्राला विरोध करण्यापुरती मर्यादित होती.