अमोल कोल्हेंनी शिवाजीराजेंची भूमिका का केली असे कधी विचारले का? : नाना पाटेकर

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आता जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मी देखील ही गोडसेंची भूमिका केली होती. पण आता मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो असं होतं का? समर्थन केले असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला विचारलं तुम्ही गोडसेची भूमिका का केली? ते माझं उपजीविकेचे साधन, यात माझी काय चूक आहे का? असा सवालही त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे यांनी १३-१४ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. पण त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून कोल्हे यांना मान्य केले. मग आता कलाकार म्हणून वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.