राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरता आणि परिवारवादी पक्ष – बापट

पुणे : पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येवू लागताच एकमेकांवर राजकीय पक्ष आता टीका करू लागले आहेत. यातूनच पुण्यात आज भाजप खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा एकदा डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष आहे, अशा शब्दात बापट यांनी टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीत दोन चार लोकचं निर्णय घेतात. तो पक्ष परिवारवादी पक्ष आहे, अशी टीका बापट यांनी केली आहे. बापट यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगतापांना आव्हान दिलं आहे. 15 मार्चला 16 नगरसेवक भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला होता. जगताप यांनी दावा केलाय मात्र 16 मार्चला भेटू असं आव्हान गिरीश बापट यांनी दिलं आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपवर कोणाचाही परिणाम होणार नाही. अजित पवारांचा नाही तर कोणाचाच परिणाम आमच्यावर होणार नाही, असं गिरीश बापट म्हणाले. भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असा दावा, खासदार गिरीश बापटांनी केला.