लागा तयारीला : आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे चंद्रकांत दादांचे भाजप नेत्यांना आदेश

पुणे – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Local body elections) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत जिल्हानिहाय आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.

ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश 4 मे रोजी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होते. यानंतर आयोगानं पावसाळ्यात निवडणुका घेण्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत, हे सुप्रीम कोर्टात नमूद केले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेनंतर सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली.

यावेळी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाल महत्त्वाचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने जिल्हानिहाय त्याचा आढावा घेऊन कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगावर हा निर्णय सोपवत असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

दरम्यान, या घडामोडीनंतर भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातील नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. पाऊस कमी पडणाऱ्या भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे कोकणासह मुंबई परिसरात निवडणुका नंतर होतील. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांत आपली ताकद दाखवून भरघोस यश मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया! असं पाटील यांनी म्हटले आहे.