जिथे तिथे मुंबईकरांचाच बोलबाला! आयपीएलच्या प्लेऑफमध्ये भिडणार एकाच संघाचे तीन ‘कर्णधार’

आयपीएल 2023 चा हंगाम हळूहळू त्याच्या समारोपाकडे जात आहे. आजपासून प्लेऑफचे सामने (IPL Playoffs) सुरू होत आहेत. अंतिम फेरीसह चार सामने प्लेऑफमध्ये खेळवले जातील. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) हे संघ मंगळवारी (23 मे) पहिल्या क्वालिफायरमध्ये (Qualifier 1) आमनेसामने असतील. त्याचवेळी बुधवारी (24 मे) एलिमिनेटरमध्ये (Eliminator) लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी (LSG vs MI) होणार आहे. यानंतर शुक्रवारी (26 मे) क्वालिफायर-2 खेळवला जाईल. रविवारी (28 मे) अंतिम सामना होणार आहे.

दरम्यान आयपीएलमध्ये प्लेऑफ किंवा शेवटच्या चारमध्ये पोहोचणाऱ्या संघांच्या कर्णधाराबाबत अनोखा योगायोग जुळून आला आहे. याचा थेट संबंध आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाशी आहे. चला तर जाणून घेऊया…

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांपैकी तीन संघांचे कर्णधार हे मुंबई इंडियन्सचा भाग राहिले आहेत. होय, रोहित शर्मा (Rohit Sharma) हा मुंबई इंडियन्सचा विद्यमान कर्णधार आहे. तो 2011 पासून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग असून त्याने त्याच्या नेतृत्त्वपदाखाली मुंबईला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. रोहितव्यतिरिक्त गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू राहिला आहे. हार्दिकने 2015 ते 2021 या काळात मुंबईकडून अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावली होती. तर हार्दिकचा भाऊ आणि लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) हा देखील 2016 ते 2021 या काळात मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.