उन्हाळी लागल्यावर काय करावे? ‘हे’ घरगुती उपाय करत त्वरित दूर करा उन्हाळीचा त्रास

उन्हाळ्यात उष्णतेमुळे उन्हाळी लागण्याचे प्रमाण वाढते. उन्हात बाहेर गेल्यास डोक्याला खूप ऊन लागते, अशावेळी उन्हाळी लागू शकते. तसेच उन्हाळ्यात कमी पाणी पिल्यासही अंगातील गरमी वाढते आणि उन्हाळी लागते. उन्हाळी लागल्यानंतर लघवी करताना खूप जळजळ होते, गुप्तांगात त्रास होतो. हा त्रास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असह्य करतो. त्यामुळे उन्हाळी लागल्यानंतर कोणते उपाय करुन हा त्रास कमी करता येईल, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उन्हाळी लागल्यास उपाय :-

भरपूर पाणी प्यावे- 
भरपूर पाणी प्यायलं तर त्या पाण्यावाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. साहजिकच उन्हाळी थांबवण्याचा हा एक सोपा उपाय आहे. यासाठीच जर उन्हाळी सुरू असेल अशा वेळी तुम्ही हायड्रेट राहणं गरजेचं ठरतं. माणसाने हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन लीटर पाणी प्यायला हवं. कारण त्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पणे सुरू राहतात. आपल्या शरीराला सर्व कार्य व्यवस्थित करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. पण  जर तुम्ही पाणी कमी प्यायला तर तुमचं शरीर डिहायड्रेट होतं आणि शरीरातील टॉक्सिन्स वाढू लागतात. असं झालं तर उन्हाळीचा  अधिकच त्रास जाणवू शकतो. तसेच पाय पाण्यात ठेवून बसणे, डोके ओले करणे, असे उपायही करू शकता.

लवंग तेलाचा वापर-
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी अथवा पोटाचे आरोग्य राखण्यासाठी केला जाणारा हा एक जुना घरगुती उपाय आहे. कारण लवंग तेलामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय लवंग अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि मायक्रोबायल देखील आहे. ज्यामुळे तुमच्या मूत्रमार्गातील इनफेक्शन पटकन बरे होते. मात्र लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात लवंग तेल पोटातून घेऊ नका. कारण आठवड्यातून एका पेक्षा जास्त वेळा लवंगतेल पोटात घेतल्यास इतर दुष्परिणाम जाणवू शकतात.

प्रो बायोटिक्स घेणे-
उन्हाळी लागणं म्हणजे मूत्रमार्गात इनफेक्शन होणं. आपल्या शरीराला अशा जीवजंतूना नष्ट करण्यासाठी हेल्दी बॅक्टेरियाची गरज असते. कधी कधी उन्हाळी लागणं हे तुम्ही घेतलेल्या उष्ण औषधांचा दुष्परिणामही असू शकतो. त्यामुळे अशा वेळी युरिनरी इनफेक्शन बरे करण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात दही खायला हवं. कारण दह्यातून तुमच्या शरीराला पुरेसे प्रोबायोटिक्स मिळतात. आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, आंबोळी, ढोकळा यातूनही तुम्हाला प्रोबायोटिक्स मिळतात.

व्हिटॅमिन सी युक्त आहार-
शारीरिक आरोग्य राखण्याचा सोपा मार्ग म्हणजे नेहमी संतुलित आहार घेणे. कारण तुमच्या आहारातून तुमच्या अनेक शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. जर तुम्हाला उन्हाळीचा त्रास सुरू असेल तर अशा वेळी तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्यायला हवा.कारण यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि सर्व समस्या दूर होतात. उन्हाळी लागल्यास तुम्ही संत्री, पपई, पेरू, आंबा, किवी, स्टॉबेरी अशी फळं खायला हवी.

वेलची चघळा-
वेलची शरीरासाठी फायदेशीर आणि पचनासाठी उत्तम असते. वेलचीमुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. वेलची खाण्यामुळे तुम्हाला लघवी योग्य प्रमाणात होते. ज्यामुळे तुमच्या शरीरातून सर्व टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. वेलचीमुळे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. यासाठी वेलची तोंडात ठेवून चघळा अथवा दूधात वेलची पावडर मिसळून ते प्या ज्यामुळे उन्हाळीचा त्रास कमी होईल.

(टीप- हा लेख केवळ माहितीकरिता देण्यात आला असून त्याचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकिय तज्ञांचा सल्ला घ्यावा. आझाद मराठी त्याची पुष्टी करत नाही.)