उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना भवन, सर्व शाखा आणि निधी यावर शिंदे गटाकडून दावा

मुंबई- शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या नावावर करुन घेतल्यानंतर शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.  शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून सर्वांची झोप उडवली आहे. या वकिलाने ही नवी याचिका कोर्टात दाखल केली आहे. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा, अशी मागणी आशिष गिरी यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर येत्या 24 तारखेला सुनावणी करण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाला केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, आशिष गिरी यांनी सादर केलेल्या याचिकेचा आणि शिंदे गटाचा काही संबंध आहे की नाही याची काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळेही तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.