जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये हिंदू बँक मॅनेजरची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या

कुलगाम – जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir News) पुन्हा एकदा हिंदू नागरीकास अतिरेक्यांकडून (Jammu Kashmir Hindu Murder) निशाणा बनवण्यात आलं आहे. कुलगाममध्ये एका बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेला बँक कर्मचारी हिंदू होता. मूळच्या राजस्थानात राहणाऱ्या या बँक कर्मचाऱ्याची काश्मिरात हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिण काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात बँक कर्मचारी असलेल्या विजय कुमार यांची हत्या करण्यात आली. विजय कुमार (Vijay Kumar) हा बँक मॅनेजर होता. कुलगाम भागातील एका बँकेचे मॅनेजर असलेल्या विजय कुमार यांच्यावर सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विजय यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दरम्यान,  काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रजनी बाला (Rajni Bala) यांची गेल्या मंगळवारी कुलगाम येथील सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या आधी, लिपिक राहुल भट (Rahul Bhat) यांची १२ मे रोजी बडगाम जिल्ह्याचे तहसीलदार चदूरा यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 18 मे रोजी, दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे दारूच्या दुकानात घुसून ग्रेनेड फेकला, ज्यात जम्मू भागातील एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.