‘वैफल्यग्रस्त झालेले उद्धवजी उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही’

मुंबई – संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस – राष्ट्रवादी ला मान्य आहे का ? माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करताना नक्कीच   शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धवजी काहीच करीत नाहीत.

आता उद्धवजी यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली. ही नवी युती उद्धव जी सोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना मान्य राहणार आहे का? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धवजी यांची ही धडपड तर नाही ना ? उद्धवजी यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का? वैफल्यग्रस्त झालेले उद्धवजी उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही. असं देखील ते म्हणाले.