मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे – खासदार सुप्रिया सुळे

भाजपचे आश्वासन केवळ निवडणूक जुमला- खासदार सुप्रिया सुळे

मुंबई- दिल्लीमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भात केंद्र सरकारने लोकसभेत विधेयक मांडले. या विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाकडून कायमच आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मला ते मान्य आहे कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. पण मला भाजपाला एक प्रश्न विचारायचा आहे घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान, प्रफुल पटेल, दुष्यंत चौटाला हे सगळे असतात. हे सगळे घराणेशाहीचं मेरिट सांगणारे नाहीत का? तुमच्या बरोबर असले तर मेरिट आम्ही जर बरोबर असलो तर घराणेशाही असं कसं काय चालेल? असा प्रश्न खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule News) यांनी भाजपला यावेळी विचारला आहे.

सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, भाजपा खासदारांची, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली तरीही चालतं. मात्र आम्ही केलं तर ती घराणेशाही असते. माझ्या मतदार संघात जाऊन भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी काय म्हटलं होतं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी आहे. मला आता यांच्याकडून स्पष्टीकरण हवं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात सत्तेत कशी काय? आम्ही तुमच्या बरोबर आलो तर आम्ही चांगले आणि विरोधात गेलो तर आम्ही वाईट असं नसतं. ही लोकशाही आहे लोकशाहीत असं घडत नाही असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हे सगळे आता नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत. यांनी सांगितलं दिल्लीच्या सचिवांना मारहाण झाली. जर तुमच्याकडून चूक झाली आहे. मीनाक्षी लेखींनी मांडलेल्या मुद्द्याशी मी सहमत आहे. मग महाराष्ट्रात काय झालं? तिथे अधिकाऱ्यालाही मारहाण झाली. तिथे तुमचे १०५ आमदार आहेत. महाराष्ट्रातही अधिकाऱ्याला मारहाण झाली ती बाबही चुकीचीच आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या की, भाजपाकडून २०१४ आणि २०१९ मध्ये आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं आहे आणि आम्ही विजयी झालो आहोत याचा डंका वाजवला जातो. मग अरविंद केजरीवाल यांना एक नियम आणि केंद्राला एक नियम हा कुठला न्याय आहे. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना कौल दिला आहे. तिथे राज्यपाल ढवळाढवळ करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकार आम्हाला जनादेश मिळाला आहे म्हणून स्वतः गुणगान गातं आहे हा नेमका कुठला न्याय आहे असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी लोकसभेत विचारला आहे. लोकशाहीच्या मार्गाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबची निवडणूक जिंकता आली असंही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

जम्मू काश्मीर (J & K) हे एक राज्य होतं त्याचं रुपांतर तुम्ही तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलं. त्यानंतर माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं एक वर्षात तिथे निवडणूक घेतली जाईल. आज चार वर्षे झाली आहेत तिथे निवडणूक घेण्यात आलेली नाही. या सगळ्याला मनमानी म्हणायचं नाहीतर काय? असाही प्रश्न सुप्रियाताई सुळें यांनी विचारला आहे. लोकसभेत दिल्लीतल्या सेवा विधेयकावर चर्चा होती त्यावेळी अनेक खासदारांनी भूमिका मांडली याच वेळी खासदार  सुळेंनीही आपली भूमिका मांडली आणि सरकारवर प्रश्नांच्या फैऱ्या झाडल्या आहेत.