पुण्यातील कमांड रुग्णालय येथे रक्तदान शिबिर संपन्न; रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला

Pune – सशस्त्र दलाचे जवान राष्ट्र आणि त्याच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी नेहमीच आघाडीवर असतात, मग युद्ध असो वा शांततेचा काळ. या बरोबरीनेच, आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, पुण्यातील कमांड रुग्णालय (एससी), येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण कमांड मुख्यालयाचे  चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी मेजर जनरल एमएस तेवतिया, कमांडंट, सीएच (एससी) यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या शिबिराचे आयोजन प्रयोगशाळा विज्ञान विभाग, सीएच (एससी) यांनी, एएफएमसी,पुणे यांच्या  सहकार्याने केले होते.

रक्तदान शिबिराला सेवेतील जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या योगदानाची विशेष नोंद झाली. प्रतिकात्मक स्वरुपात, स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांकडून 75 युनिट मौल्यवान रक्त संकलित करण्यात आले.  लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी स्वतः सर्वप्रथम रक्तदान केले. रक्तदात्यांना आयोजकांतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.या पवित्र कार्यात एकूण 75 रक्तदाते सहभागी झाले होते. एका रक्तदात्यामुळे चार लोकांचे प्राण वाचू शकतात याचा विशेषत्वाने उल्लेख करणे आवश्यक आहे.

या उपक्रमात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दक्षिण कमांड मुख्यालयाच्या चीफ ऑफ स्टाफ यांनी आयोजक संघाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी रक्तदात्यांनाही शुभेच्छा दिल्या. मानवी जीवन वाचवण्यात रक्तदात्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर आणि अशा शिबिरांच्या आयोजनात सातत्य ठेवण्यावरही त्यांनी भर दिला.