मी साधी सिगारेटही ओढत नाही ओ, काशिफ खानने मलिकांचे आरोप फेटाळले

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील दाढीवाल्या व्यक्तीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याची माहितीही त्यांनी आज मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. त्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असे असून हा मोठा ड्रग पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला. शिवाय हा व्यक्ती अवैध सेक्स रॅकेट, पॉर्नोग्राफी चालवत असल्याचे ते म्हणाले. काशिफ खान हा समीर वानखेडेचा चांगला मित्र आहे. अनेक अधिकाऱ्यांनी काशिफ खानवर कारवाईचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम वानखेडे यांनी केल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर आता काशिफ खान यांनी समोर येत नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती आहे. मला वाटतं की त्यांच्याकडे सर्व चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी साधी सिगारेटही ओढत नसल्याचं लोकांना माहित आहे. असे काशिफ खान याने म्हंटले आहे.

तर, माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत, चुकीचे आहेत. ते असं का करत आहेत हेही मला माहिती नाही. मी त्यांना ओळखत नाही, मी कधीही त्यांना भेटलेलो नाही. मला माहिती नाही ते मला यात का ओढत आहेत. पण मला खात्री आहे की त्यांना ज्यांनी कुणी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे, असं काशिफ खान म्हणाले आहेत.