क्रांती एक मराठी मुलगी आहे, तिच्याविषयी आम्हाला प्रेमच – संजय राऊत

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. या सगळ्या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी देखील पुढे येत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित भावनिक आवाहन केले आहे.

‘लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का ? असा सवाल क्रांती रेडकर यांनी विचारला आहे. त्यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आहे. सरकार हे ठाकरे सरकार आहे. शरद पवार आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथे कुणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी समीर वानखेडेंबाबत बोलण्यास नकार दिला. गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. त्याविषयी मी फार बोलणार नाही. कारण तो सरकारचा विषय आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.